पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला दारूसह ३.६२ लाखांचा मुद्देमाल

पाठलाग करून दोघांना घेतले ताब्यात

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दि.21 च्या रात्री दारूच्या पेट्या घेऊन येणारी कार शासकी विश्राम भवनाजवळ सापळा लावून पकडली. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना पथकाने पाठलाग करून पकडले. या कारवाईत कारसह 3.62 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना गडचिरोलीच्या ढिवर मोहल्ल्यातील गोपाल बावणे हा त्याच्या सहकाऱ्यांमार्फत चंद्रपूर जिल्ह्यातून चारचाकी वाहनाने शहरातील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारु व बियरचा पुरवठा करण्याकरीता दारुची खेप आणणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय विश्राम भवनाजवळ रात्री सापळा रचुन नाकाबंदी केली.

संशयित पांढऱ्या रंगाची अल्टो कार येताना दिसताच थांबण्याचा इशारा केला. पण चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याला न जुमानता वाहनासह पळ काढला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग करून सदर वाहनास अडविले. यावेळी वाहन चालक व त्याचा साथीदार प्रफुल टिंगुसले, रा.गोकुळनगर आणि गणेश टिंगुसले, रा.ढिवर मोहल्ला यांना ताब्यात घेतले. या अवैध दारू वाहतुकीत सहभागी असलेला गोपाल बावणे हा कारवाई सुरु असताना अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी वाहनाने फरार झाला.

या वाहनात देशी दारुच्या 14 पेट्या, विदेशी दारुच्या 2 पेट्या, बिअरच्या 2 पेट्या आणि 2 लिटर क्षमतेचे विदेशी दारुचे 6 बंपर दिसुन आले. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल आव्हाड, अंमलदार प्रशांत गरुफडे, श्रीकृष्ण परचाके, चालक दीपक लोणारे यांनी केली.