अनुसूचित क्षेत्र वगळता गैरआदिवासी युवकांसाठीही पदभरती घ्यावी

संतोष ताटीकोंडावार यांची वनमंत्र्यांकडे मागणी

गडचिरोली : वनविभागाकडून वनरक्षक ‘गट क’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. याअंतर्गत 30 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र या पदभरतीत गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जमातीकरिता अनुसूचित क्षेत्रातील उमदेवारांसाठी पदभरती राबविण्यात येत आहे. तर बिगर अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना या पदभरतीपासून वंचित ठेवल्या गेले आहे. यामुळे तलाठी भरतीप्रमाणे वनरक्षक भरतीतही गैरआदिवासींवर अन्याय होत आहे. त्यामुळे अनुसूचित क्षेत्र वगळता गैरआदिवासी युवकांसाठीही पदभरती घ्यावी, अशी मागणी भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन केली.

निवेदनात म्हटले आहे की, वनरक्षक पदभरती ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गैरसमजामुळे अनेक अडचणी येत आहेत. अर्ज भरताना अनावधानाने चुका झाल्यास परत अर्जात सुधारणा किंवा बदल व अर्ज रद्द करण्याचा अवधी देण्यात आलेला नाही. परिणामी अनेक विद्यार्थी वनरक्षक पद भरती प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जात बदल किंवा सुधारणा करण्याचा वा अर्ज रद्द करण्याचा पर्याय ठेवल्यास विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होऊ शकते.

तसेच खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये तर आरक्षित प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे अवाढव्य शुल्क आकारण्यात येत आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवार सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याने प्रवेश शुल्काचे दर कमी करावे, पदभरतीत गैरआदिवासींनाही संधी देण्यासाठी वनरक्षकाच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी वनमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.