भाजपवासी झालेल्या दोन डॅाक्टरांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

डॅा.किरसान यांना बाहेरचे म्हणणे भोवले

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॅा.नामदेव किरसान यांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राबाहेरील म्हणने भाजपवासी झालेले माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी आणि डॅा.नितीन कोडवते यांना महागात पडले आहे. गडचिरोली पोलिस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

डॅा.किरसान हे या मतदार संघाचे रहिवासी नाही, असे पॅाम्प्लेट त्यांनी प्रकाशित केले होते. त्यावर प्रकाशक म्हणून डॅा.नामदेव उसेंडी आणि डॅा.नितीन कोडवते यांची नावे होती. त्यांनी खोटी माहिती प्रकाशित करून ती पसरविल्याची तक्रार किरसान यांच्या वतीने निवडणूक यंत्रणेकडे करण्यात आली होती. आचारसंहिता पालन तपासणी पथकाने त्या तक्रारीच्या आधारे चौकशी केली असता डॅा.किरसान यांच्या तक्रारीत तथ्य आढळले.

डॅा.किरसान हे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील रहिवासी असल्याचे तथ्य समोर आल्यानंतर आचारसंहिता तपासणी पथकाने तसा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला. त्या आधारे हे प्रकरण पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी डॅा.उसेंडी आणि डॅा.कोडवते यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.