पत्नी आणि मुलीवर नजर होती वाईट, म्हणून त्यांच्यात झाली जीवघेणी फाईट

युवकाच्या खुनाचे रहस्य उलगडले

देसाईगंज : महिनाभरापूर्वी कुरूड गावातील प्रतिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार (30 वर्षे) हा युवक डोक्यावर मार लागल्याने अवस्थेत सापडल्याने गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा काही तासात मृत्यू झाला. त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देसाईगंज पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत कोणताही सुगावा नसताना आरोपीचा शोध सुरू केला. अखेर त्याचा शोध लावण्यात यश आले. मृत युवक आपल्या पत्नी आणि मुलीकडे वाईट नजरेने पहायला, त्यांच्यावर कॅामेंट करायचा, म्हणून त्याचे तोंड कायमचे बंद केल्याची कबुली त्याने दिली.

विकास जनार्दन बोरकर (50 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर 11 मार्चपर्यंत पीसीआर देण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार हा आरोपी विकास जनार्दन बोरकर यांच्या पत्नी व मुलीकडे वाईट नजरेने बघायचा. त्यांच्यावर वाईट कॅामेंट करायचा. त्यांच्या घरासमोर येऊन अश्लिल शिवीगाळ करायचा. त्यामुळे मृत युवक आणि आरोपी यांच्यात नेहमी भांडण होत होते. गेल्या 8 फेब्रुवारीला रात्री 10 वाजताच्या दरम्यान आरोपी युवकाने नेहमीप्रमाणे शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे आरोपी बोरकर याने प्रतिभ याच्या डोक्यात सिमेंटच्या कवेलुने मारुन गंभीर जखमी केले.

उपचारादरम्यान प्रतिभ याचा मृत्यू झाला. हा खून असल्याचे स्पष्ट झाले असले तरी आरोपीने कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. अशात पोलिस उपनिरीक्षक संजय गोंगले यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांनी पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नियंत्रणाखाली एक तपास पथक नियुक्त केले. या पथकासह पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, अंमलदार ढोके यांनी मिळविलेल्या गोपनिय बातमीदारांच्या माहितीवरुन संशयित म्हणून विकास जनार्दन बोरकर (धंदा मजुरी) याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.