वाहनातून सुरू असलेली देशी-विदेशी दारूच्या 50 पेट्यांची वाहतूक रोखली

एलसीबीच्या पथकाची आष्टीजवळ कारवाई

गडचिरोली : दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने होणाऱ्या दारु विक्री व वाहतुकीला थांबवण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने आष्टीजवळ एक वाहन पकडले. या कारवाईत चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारूचा पुरवठा करणारे वाहन आणि 50 पेट्या देशी-विदेशी दारूसह एकूण 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसा सुत्रानुसार, आष्टी पोलिसांच्या हद्दीतील दारु तस्कर गोपाल पोयडवार, रा.पारडी, ता.लाखांदुर, जि.भंडारा हा त्याचा सहकारी अंजय्या पुल्लुरवार रा.ब्रम्हपूरी, जि.चंद्रपूर याच्या मार्फत चंद्रपूर जिल्ह्यातून टाटा कंपनीच्या अरीया या चारचाकी वाहनाने आष्टी व अहेरी येथील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारुचा अवैधरित्या पुरवठा करण्यासाठी दारूची खेप आणणार होता. याची माहिती एलसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रभारी अधिकारी पोनि. उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक आष्टी येथे रवाना केले.

एलसीबीच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी कंसोबा मार्कंडा फाटा, आष्टी येथील फॉरेस्ट नाक्याजवळ सापळा रचून 12 ते 3.30 वाजेदरम्यान वाहनाच्या प्रतीक्षेत असताना ते वाहन आले. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्समुळे चालकाने वाहन वळवून पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळून जाणा­या वाहनास मोठ्या शिताफीने अडविले. त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारुच्या 50 पेट्या दिसून आल्या.

ही कारवाई सपोनि. राहुल आव्हाड, हवालदार दीपक लेनगुरे, अकबर पोयाम, अंमलदार श्रीकृष्ण परचाके, श्रीकांत बोईना व चालक विनोद चापले यांनी केली.