गडचिरोली पोलिसांनी नष्ट केला 13 गुन्ह्यांत जप्त केलेला 407 किलो गांजा

खोल खड्डा करून लावली विल्हेवाट

गडचिरोली : जिल्ह्यात विविध पोलिस स्टेशनमध्ये अंमली पदार्थांसंदर्भात दाखल 13 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला 407 किलो गांजा (अंमली पदार्थ) पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने खोल खड्ड्यात गाडून तो नष्ट केला.

यात गडचिरोली पोलिसांत दाखल 4 गुन्हे, असरअल्ली येथील 2 गुन्हे, अहेरी येथील 3 गुन्हे आणि चामोर्शी, धानोरा, मुलचेरा, रेपनपल्ली येथील प्रत्येकी एका गुन्ह्यातील जप्त एकूण 407.095 कि.ग्रॅ. गांजाचा समावेश होता.

अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सदस्य अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, प्र.पोलिस उपअधीक्षक (मुख्या.) विश्वास जाधव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर येथील सहा.रासायनिक विश्लेषक विलास ठानगे, वजन मापे विभागाचे प्रतिनिधी निरीक्षक प्रकाश ऊके, जिल्हा परिषद येथील पंच लाचुलू मडावी, अक्षय राऊत यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, उपनिरीक्षक सरीता मरकाम, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार नरेश सहारे, दीपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, शुक्राचारी गवई, राकेश सोनटक्के, हेमंम गेडाम, सुनील पुठ्ठावार, माणिक दुधबळे, उमेश जगदाळे, माणिक निसार, मनोहर टोगरवार यांनी पार पाडली.