अखिल भारतीय पोलिस तिरंदाजी स्पर्धेत गडचिरोलीच्या पीएसआयला कांस्यपदक

सुरज अनपट यांची यशस्वी कामगिरी

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात आपली सेवा बजावत असताना पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदार आपले विविध कलागुणही जोपासत असतात. बेंगलोर येथे झालेल्या 12 व्या अखिल भारतीय पोलिस तिरंदाजी स्पर्धेत गडचिरोली पोलिस दलातील आरमोरी पोलिस स्टेशनला कार्यरत उपनिरीक्षक सुरज अनपट यांनी इंडियन राऊंड प्रकारात महाराष्ट्र पोलिस संघाचे नेतृत्व करत कांस्यपदक पटकावले.

उपनिरीक्षक अनपट हे सध्या आरमोरी पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. कांस्य पदकासाठी महाराष्ट्र पोलिस संघाने आयटीबीपी संघाचा 6-4 अशा फरकाने पराभव केला.

गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश यांनी देखील पोउपनि सुरज अनपट यांचे अभिनंदन केले.