गडचिरोली : भामरागडजवळच्या त्रिवेणी संगमावजवळच्या नदीपात्रातून बिनबोभाटपणे सुरू असलेली रेतीची चोरी चार दिवसांपूर्वी अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी त्यांच्या दौऱ्यात उघडकीस आणली होती. घाटावरून किती रेतीची चोरी झाली याचे मोजमाप करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. पण रेती चोरट्यांचा शोध किंवा दंडात्मक कारवाई तर दूर, अद्याप घाटावरील रेतीची मोजणीही झालेली नाही. त्यामुळे भामरागड तालुक्यात महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वनविभाग आणि रेती चोरटे यांचे संगनमत तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने सध्या रेती तस्करांकडून अनेक ठिकाणच्या घाटांवरून रेतीची लूट केली जात आहे. अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आपला मोर्चा पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या तीन नद्यांचा संगम असलेल्या ठिकाणाकडे वळविला. यावेळी तेथून सुरू असलेला रेती चोरीचा प्रकार त्यांनी उघडकीस आणला. त्यामुळे लगेच जेसीबी बोलवून नदीपात्रात वाहनांना जाण्या-येण्यासाठी तयार केलेला रस्ताही खोदून काढण्यात आला. यावेळी त्यांनी तस्करांनी आतापर्यंत किती रेती चोरून नेली याची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार प्रकाश पुप्पलवार यांना दिले. परंतू पाच दिवसानंतर अद्याप नदीपात्रातील रेती चोरीची तपासणी झालेली नाही.
एकमेकांकडे बोट दाखवून चोरट्यांना अभय?
यासंदर्भात तहसीलदार पुप्पलवार यांना विचारले असता रेतीघाटाच्या तपासणीसाठी भूमिअभिलेख अधीक्षकांना पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पोलिसातही रेती चोरीची चौकशी करण्यासंदर्भात तक्रार दिल्याचे सांगितले. पण आतापर्यंत ना मोजमाप झाले, ना अज्ञात रेती चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला.
भामरागडला लागून असलेल्या त्या रेती चोरीच्या ठिकाणावरून रेती काढली जात असताना संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याला याची कल्पना नसणे शक्य नाही. मात्र त्यांच्यावरही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. वनविभागाच्या जागेतून रस्ता बनविलेला असताना याची दखल घेण्याची गरज वनविभागाच्याही अधिकाऱ्यांना वाटली नाही. तहसीलदारांनी पोलिसात दिलेली तक्रारही केवळ एक औपचारिकताच होती. त्या तक्रारीत किती रुपयांच्या रेतीची चोरी झाली, कोणते वाहन जप्त केले का, किंवा कोणत्या संशयिताचे नाव, असे काहीही नमुद केलेले नाही. त्यामुळे त्या मोघम तक्रारीच्या आधारे आम्ही काय चौकशी करणार? असा सवाल भामरागड ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय शरद मेश्राम यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात महसूल आणि वनविभागाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. अशा स्थितीत हे प्रकरण थंडबस्त्यात पडते की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.