डॉ.आंबेडकरांवर माथेफिरूंकडून आक्षेपार्ह लिखाणाचे संतप्त पडसाद

कारवाईसाठी आष्टी ठाण्यावर धडक

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टीजवळ असलेल्या सोमनपल्ली फाट्यावरच्या बस थांब्यावर कोणी माथेफिरूने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक व आक्षेपार्ह विधान लिहिलेले आढळले. यामुळे सर्वत्र संतापजनक पडसाद उमटले. त्या अज्ञात माथेफिरूंना अटक करून कठोर कारवाई करावी यासाठी आझाद समाज पार्टी युवा आघाडीच्या नेतृत्वात नागरिकांनी आष्टी पोलीस स्टेशनवर धडक दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कुण्या विशिष्ट जातीचे महापुरुष नाही. त्यांनी दिलेले संविधान हे कुण्या एका विशिष्ट जातीसाठी नाही तर समस्त बहुजनांच्या व भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हक्क-अधिकाराचे प्रतीक आहे. असे असताना कोणी माथेफिरूने बस थांब्यावर आक्षेपार्ह टिपणी लिहीण्याचे हे कृत्य समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी आझाद समाज पक्षाच्या युवा आघाडीचे अध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला 24 तासात शोधून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

जाणीवपूर्वक स्प्रे पेंटिंगने लिखाण

बस थांब्यावर लिहिलेली टिप्पणी ही ब्रशने लिहिलेली नसून स्प्रे पेंटिंगचा वापर केला आहे. याचा अर्थ पेंट करणारी व्यक्ती चलाख असल्याचे दिसून येते. वेळ, परिस्थिती व ठिकाण याचा व्यवस्थित अभ्यास करून हे कृत्य त्या व्यक्तीने केले आहे. याचा अर्थ जाणीवपूर्वक असे लिखाण करून समाजात वाद निर्माण करण्याचा उद्देश आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत मतांचे ध्रुवीकरण करणे हा त्यामागील उद्देश असल्याचा आरोप आझाद समाज पार्टीचे राज बन्सोड यांनी केला आहे.

डॉ.बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही– मा.खा.नेते

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोमनपल्लीच्या बस थांब्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने उमटलेल्या संतापानंतर या घटनेच्या निषेधार्थ आष्टीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमून नागरिकांनी निदर्शने केली. यावेळी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते हे आलापल्ली येथे महत्त्वाच्या बैठकीसाठी जात असताना त्यांनी आष्टीत थांबून घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेऊन या निषेध आंदोलनात सहभाग घेतला.

या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर मा.खा.नेते यांनी आष्टी ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना या कृत्यामागील दोषीवर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. यावेळी अशोक नेते यांनी बाबासाहेबांचा जयजयकार करत त्यांचा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही. बाबासाहेबांच्या विचारांवरच नवभारताचे भवितव्य उभे आहे. त्यामुळे समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या या कृत्याचा मी निषेध करतो, अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, माजी जि.प.सदस्य धर्मप्रकाश कुकडकर, आष्टी ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच मोठ्या संख्येने बौद्ध समाजबांधव आणि नागरिक उपस्थित होते.

‘त्या’ समाजकंटकाला अटक करा, अभारिपची मागणी

सोमनपल्ली फाट्यावरील बस थांब्यावर समाजकंटकाने लिहिलेल्या अपमानजनक व आक्षेपार्ह मजकुराचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला. सदर कृत्य करणाऱ्या लोकांना पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

पोलिसांनी तो मजकूर लिहिलेले टिनाचे पत्रे जप्त केले आहेत. पण या प्रकारामुळे डॅा.बाबासाहेबांच्या अनुयायांसह संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या असून हे कृत्य अत्यंत निंदनीय व देशद्रोहाचे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्या समाजकंटकांना त्वरित पकडून कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा.राजन बोरकर, केशरावराव सामृतवार, महिला नेत्या सुरेखा बारसागडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, विधानसभा अध्यक्ष प्रदीप भैसारे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष नीता सहारे, युवा आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र रायपुरे आदींनी केली आहे.