गडचिरोली : गडचिरोली शहरातील एका खासगी गोदामातून धानाची तब्बल ७५० पोती चोरीला गेली आहेत. त्या धानाची किंमत १४ लाख रुपये होती. विशेष म्हणजे चोरट्यांनी ही पोती चोरल्यानंतर गोदामाला स्वत:चे कुलूपही लावून ठेवले. त्यामुळे ही चोरी नेमकी कधी आणि कशी झाली हे कळायला मार्गच राहिलेला नाही. हे गोदाम भाजपचे नेते गोविंद सारडा यांचे आहे.
प्राप्त माहितीनुसार, खरपुंडी नाक्याजवळ सारडा यांचे हे खासगी गोदाम आहे. गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यात सारडा यांच्या या गोदामात धान भरडाईपूर्वी ७५० पोती धान साठवून ठेवलेला होता. मार्च ते जून महिन्यापर्यंत गोदामावर त्यांची देखरेख होती. पण जूननंतर ते गोदामाकडे गेले नाही. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्या गोदामात ठेवलेली ७५० पोती धान गायब केला. या चोरीनंतर चोरट्यांनी आपले कुलूप त्या गोदामाला लावून ठेवल्याने चोरी झाल्याचे सारडा यांच्या लक्षात आले नाही. जेव्हा लक्षात आले त्यावेळी बराच उशिर झालेला होता.
ही चोरी नेमकी कधी झाली, कशी झाली, इतके दिवस चोरीचा सुगावा लागू न देण्यात चोरटे यशस्वी कसे झाले आणि त्यांनी जाताना गोदामाला कुलूप लावून का ठेवले, अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना गडचिरोली पोलिसही चक्रावून गेले आहेत. त्यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झाले आहे.