कुरखेडा-देसाईगंज मार्गावर वाहनचालक संघटनेचा दिड तास चक्काजाम

हिट अँड रन कायदा रद्द करण्याची मागणी

कुरखेडा : हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उबाठा)प्रणीत वाहन चालक संघटना तसेच जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कुरखेडा ते देसाईगंज मार्गावरील बायपासजवळ दिड तास चक्काजाम करून जोरदार नारेबाजी करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देऊन आंदोलकांना शांत केले.

हिट अॅन्ड रन कायद्यात अपघाताला जबाबदार वाहन चालकाला १० वर्षाचा कारावास आणि ७ लाखांच्या दंडाची तरतूद आहे. जेमतेम मिळकतीवर कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब वाहन चालकांचे कुटूंबच या कायद्याने उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याने या कायद्याचा विरोध केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कुरखेडा तालुक्यातील वाहन चालक संघटना १ जानेवारीपासून आपले सर्व खासगी प्रवासी, मालवाहक वाहने बंद ठेवत आंदोलनात सहभागी झाले आहेत. सोमवारी तहसीलदारांमार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले होते. मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

दरम्यान आंदोलनस्थळी पोहोचत ठाणेदार संदीप पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करत त्यांची समजूत काढून रस्ता मोकळा केला. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख सुरेंन्द्रसिंह चंदेल, तालुका प्रमुख आशिष काळे, जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेचे तालुका अध्यक्ष भारत गावळ, सचिव जावेद शेख, उपाध्यक्ष शाम थोटे, सचिन पंडित, कैलाश उईके, आशिष हिळको, अनिल ठाकरे, एजाज शेख, हेमंत घोगरे, छगन मडावी, रोशन वालदे, प्रितम वालदे, बजरंग बैस, हेमंत चंदनखेडे, ओमकार निमजे, रेहान पठान, जाफर पठान, मोईन खान, जयचंद सहारे, नासिर शेख, ताहीर शेख, इंन्द्रजीत ताराम, चिंतामन सहारे, दीपक मेश्राम, प्रदीप मानकर, प्रकाश कुमरे, प्रमोद मेश्राम, विनोद होळी, जयंत निमजे, लंकेश नंदनवार, राजू टेंभुर्णे, विलास कुमरे, राजू नागपूरे, लक्ष्मण मेश्राम, सुनील हिरापुरे, धनसिंग नैताम तसेच मोठ्या संख्येने वाहन चालक उपस्थित होते.