खा.अशोक नेते यांनी केला गुणवंतांचा सत्कार, वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार

'शिवकृपा'ची माही उराडे होणार डॅाक्टर

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत गडचिरोलीतील शिवकृपा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवून 99 टक्के निकाल दिला. विशेष म्हणजे या महाविद्यालयाच्या माही हंसराज उराडे या विद्यार्थिनीने 92.50 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. माहीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा खासदार अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिवकृपा विज्ञान महाविद्यालयाचे 186 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 185 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात माही उराडे ही 92.50 टक्के गुणांसह जिल्ह्यात द्वितीय आली. याशिवाय सलोनी अशोक कोलटकर (80.33 टक्के), वृषभ बाबुराव उईके (80.33 टक्के) यांनी महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकविला. याच महाविद्यालयाच्या मृणाल मिलिंद भसारकर (77.67 टक्के), भूषण मनोहर कोकोडे (77 टक्के), तन्वी प्रकाश कुनघाडकर (74.50 टक्के), पूनम दामोदर बोलीवर (70.67 टक्के), भार्गवी बळीराम नरोटे (70.50 टक्के) यांनीही उज्वल यश संपादन केले. या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार केला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.पी दुर्गम, प्रा.एन.आर. मोहुर्ले, एस.एस. वाटेकर, पी.जी. जाळे, कु.एम एन रोहनकर, तसेच शिक्षकेतर कर्मचारी सी.एन. शेटे, व्ही.बी. रोहनकर, के. एन. हवालदार, पी.जी.कांबळे, आर. ए. संतोषवार, तसेच पालक उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार

जिल्ह्यात द्वितीय आलेल्या माही उराडे या विद्यार्थिनीने यावेळी आपली भावना व्यक्त करताना वैद्यकीय क्षेत्रात जाऊन समाजाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. शिवकृपा महाविद्यालयाचे आम्ही ऋणी राहील, असे सांगत त्यांनी या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार अशोक नेते, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले. भाजप सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे गडचिरोलीत शासकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय स्वप्नपूर्ती करणारे ठरतील. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी खा.अशोक नेते यांनी व्यक्त केला.