प्रतिबंधित सुगंधित तंबाखू बाळगणाऱ्या 40 पानठेले-दुकानदारांवर कारवाई

आरमोरी पोलिसांनी राबविली मोहीम

आरमोरी : महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू विक्री आणि वाहतुकीवर प्रतिबंध घातला असतानासुध्दा गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणात त्याची विक्री व वाहतुक केली जाते. त्याला अंकुश घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार आरमोरी पोलिसांनी शुक्रवारी (दि.24) विशेष मोहीम राबवत अनेक गावातील पानठेले आणि दुकानदारांवर कारवाई केली.

आरमोरी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आरमोरी, वैरागड, देऊळगाव, वडधा, ठाणेगाव, मानापूर, अरसोडा, बर्डी, वघाडा, जोगीसाखरा व अंतरंजी या गावांमध्ये ही कारवाई करण्यात आली. शाळांपासून 100 मीटरच्या आत असलेल्या, तसेच गावाच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पानठेल्यांवर, तसेच दुकानांमध्ये मिळून 40 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

तपासणे केलेल्या संबंधित पानठेले आणि दुकानांमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रीसाठी ठेवत असल्याची गोपनिय माहिती प्रभारी अधिकारी पो.निरिक्षक कैलास गवते यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने त्या दुकानांची तपासणी केली. तसेच त्यांना आपले पानठेले व दुकानांमध्ये सुगंधित तंबाखू न विकण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक नरेश सहारे, दिलीप मोहुर्ले, देवराव कोडापे, सहायक उपनिरीक्षक गौरकार, हवालदार गोन्नाडे, पिल्लेवार, कुमरे व पोलीस अंमलदारांनी राबविली.