गडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत चंद्रपूर जिल्ह्यातून साडेतीन लाखांच्या दारूच्या पेट्या आणणारे झायलो वाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री 11.30 वाजताच्या सुमारास पकडले. त्यात देशी-विदेशी दारूच्या 40 पेट्या होत्या. हा सर्व माल मोहझरी गावातील शिवा ताडपल्लीवार याला पुरवठा केला जात होता.
प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील महेश हेमके हा आपल्या 2 सहकाऱ्यांच्या मदतीने झायलो वाहनातून देशी व विदेशी दारू चंद्रपूर जिल्ह्यातून आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. गडचिरोली पोलिसांच्या हद्दीतील मोहझरी गावात ती दारू पुरवली जाणार असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.राहुल आव्हाड व त्यांच्या पथकाने रात्री 11.30 च्या दरम्यान गडचिरोली येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोरील चौकात सापळा रचून त्या वाहनाला गाठले.
वाहनाच्या तपासणीदरम्यान त्यात देशी व विदेशी दारू असलेल्या 40 पेट्या (बॉक्स) आढळल्या. त्यांची किंमत अंदाजे 3 लाख 32 हजार 800 रुपये आहे. त्या दारूच्या पेट्यांसह वाहन (एम.एच.14, सी.एस.4221) असा एकुण 5 लाख 32 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी गडचिरोली पोलीस स्टेशनला आरोपी रंजीत अरुण सरपे (25 वर्ष, रा.मुडझा, ता.ब्राम्हपुरी) चेतन देवेंद्र झाडे (25 वर्ष, रा.मुडझा, ता.ब्रम्हपुरी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दोन आरोपी महेश हेमके (रा.मुडझा, ता.ब्राम्हपुरी) आणि शिवा ताडपल्लीवार (रा.मोहझरी ता.गडचिरोली) यांचा शोध सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात अंमलदार प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे आणि चालक माणिक निसार यांनी पार पाडली.