मुलचेरा : मुलचेरा भागाचा विकास व्हावा म्हणून 1992 ला मी मंत्री असताना चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून मुलचेरा तालुक्याची निर्मिती केली. येथील नागरिकांना चामोर्शीऐवजी मुलचेरातच सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या. तालुका छोटा असला तरी माझ्या विधानसभा क्षेत्राचा एक भाग म्हणून निधी देताना मुलचेराला प्रथम प्राधान्य दिले आहे. यापुढे देखील निधीची कमतरता भासू देणार नाही. मात्र विकास कामे करताना सर्व विभागांनी समन्वय ठेवा, असे निर्देश माजी मंत्री, आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.
आ.आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली मुलचेरा पंचायत समितीची वार्षिक आमसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी युवा नेते तथा अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, तहसीलदार चेतन पाटील, गटविकास अधिकारी एल.बी.जुवारे, ठाणेदार महेश विधाते, मुलचेरा पंचायत समितीचे माजी उपसभापती महेंद्रबाबा आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा येमुलवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, जेष्ठ कार्यकर्ते रंजित स्वर्णकार, सुंदरनगरच्या सरपंच जया मंडल, गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे, प्रभारी बालविकास अधिकारी अमरी रॉय, प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस.एच.सुतार, पेडीगुडमच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने, डेव्हिड भोगी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आ.धर्मरावबाबांनी मागील आमसभेतील प्रलंबित कामांचा प्रत्येक विभागाचा आढावा घेतला आणि ती कामे पूर्ण झाल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर यंदाची मंजूर कामे, येणाऱ्या अडचणी, रखडलेल्या कामांचा आढावा घेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केली. हाती घेतलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नागरिकांनी मांडल्या विविध समस्या
यावेळी जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठ्याची समस्या, रखडलेले घरकुल, खडतर रस्ते, विजेची समस्या, बस सुविधा तसेच नगर पंचायतअंतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेली पाण्याची समस्या आदी समस्या नागरिकांनी मांडल्या. त्या समस्या सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. आमसभेत ग्रामसेवक युनियन आणि शिक्षक संघटनांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रभारी केंद्रप्रमुख महेश मुक्कावार यांनी केले.
दोन उपकेंद्रांची केली मागणी
मुलचेरा तालुक्यात 3 प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुंदरनगर प्राथमिक उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या हरीनगर येथे मागील अनेक वर्षांपासून उपकेंद्राच्या मागणीचे प्रस्ताव पाठवूनही उपकेंद्र मंजूर झाले नाही. तसेच मोहूर्ली गावात देखील नवीन उपकेंद्राची नागरिकांनी मागणी केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी बोरी येथे जावे लागत असून धान विक्रीसाठी गोडाऊन मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.