वाघाच्या मुंडक्यासह पंजेही गायब, स्थानिक शिकाऱ्यांचाच प्रताप

डुकरांसाठी लावलेल्या करंटने घेतला बळी?

गडचिरोली : जिल्ह्यातील चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या अमिर्झाच्या जंगलात विद्युत तारांमध्ये वीज प्रवाह सोडून एका वाघाची शिकार झाल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे शिकाऱ्यांनी त्या वाघाची शिकार करण्यासाठी करंट लावला होता की रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या करंटमध्ये वाघ सापडला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र ज्या पद्धतीने वाघाचे अवयव गायब करण्यात आले त्यावरून ते शिकारी स्थानिक पातळीवरचे असण्याची दाट शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या नर वाघाचा जबडा आणि तीन पायांचे पंजे कापण्यात आले आहेत. वाघाचे दात, मिशा आणि नखांना मोठी किंमत मिळते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक किंमत वाघाच्या कातड्याला आहे. त्यामुळे शिकारी टोळीचे लक्ष्य वाघाची कातडी मिळवण्याकडे असते. परंतू अमिर्झा भागात शिकार झालेल्या वाघाची कातडी पूर्णपणे शाबुत होती. एवढेच नाही तर मिशा आणि दातांसोबत नखे मिळवण्यासाठी या वाघांचे अवयव कापण्याची पद्धतही शिकारी टोळींप्रमाणे नाही. त्यामुळे या वाघाची शिकार मुद्दाम केलेली असण्याची शक्यता कमी असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक लोकांपैकीच कोणीतही या पद्धतीने अवयव कापल्याचे बोलले जात आहे.

प्रथमदर्शनी या वाघाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॅा.आशिष भोयर यांनी स्पष्ट केले. या घटनेतील संशयित व्यक्तींची तपासणी केली जात आहे. या घटनेबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी चौकशी अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक संकेत वाठोरे (मोबाईल ७६७८६५११६३) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांनी केले आहे.