दोन महिला नक्षलींसह एका सहकाऱ्याला अटक, नक्षल कॅम्पचाही केला पर्दाफाश

जिल्हा पोलिस व सीआरपीएफची कारवाई

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपाती कारवाया करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील जावेलीच्या जंगलात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या दोन महिला नक्षली आणि एका जममिलिशियाला अटक करण्यात आली. गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफच्या चमुने संयुक्तपणे ही कारवाई केली. अटक केलेल्या तीनही आरोपींवर मिळून साडेपाच लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. दुसऱ्या एका कारवाईत छत्तीसगड सीमेवरील नक्षलवाद्यांच्या कॅम्पचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिस येत असल्याची चाहुल लागताच नक्षलवादी पसार झाल्याचे पोलिस प्रशासनाने कळविले.

पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या कसनसूर, चातगाव दलमचे आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सदस्य मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ (पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) तळ ठोकून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी ते योजना बनवत असल्याची शक्यता पाहता अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख आणि सी-60 युनिट्सच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सुरू करण्यात आले. शनिवारी सकाळी पोलिस जवान 450 मीटर उंच टेकडीवर पोहोचले. पण पोलिस आल्याची चाहुल लागताच ते निघून गेले होते.

डोंगरमाथ्यावर शोध घेतला असता नक्षलवाद्यांचे एक मोठे आश्रयस्थान आणि नक्षल छावणी सापडली, ती नष्ट करण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्या भागात शोधमोहीम राबविण्यात आली.

5.50 लाखांचे ईनाम असलेले तिघे लागले हाती

नक्षलवाद्यांचा टीसीओसी कालावधी आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांविरुद्ध नक्षलवाद्यांकडून विविध हिंसक घटनांचे नियोजन केले जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलासह इतर सुरक्षा दलांकडून डोळ्यात तेल घालून देखरेख केली जात आहे. अशातच सीआरपीएफच्या मदतीने जिल्हा पोलिस दलाच्या जवानांनी दोन महिला नक्षलींसह त्यांना सहकार्य करणाऱ्या एका जनमिलिशियाला अटक करण्यात यश मिळविले. सुरक्षा दलांविरुद्ध झालेल्या अनेक हिंसक घटनांमध्ये त्या महिला नक्षलवादी, तसेच नोव्हेंबर 2023 मध्ये टिटोला गावात पोलिस पाटलाच्या हत्येमध्ये जनमिलिशिया सदस्याचा सहभाग होता.

नक्षल सदस्य असलेल्या काजल उर्फ ​​सिंधू गावडे (28 वर्ष), रा.कचलर, ता.एटापल्ली, आणि गीता उर्फ ​​सुकळी कोरचा (31 वर्ष), रा.रामाटोला, ता.एटापल्ली मौजा जावेली येथील घनदाट जंगलात संशयास्पदरीत्या फिरत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जनमिलिशिया सदस्य पिसा पांडू नरोटे, रा.झरेवाडा, ता.एटापल्ली हा नक्षली कारवाया करून पसार झालेला होता. तो गिलानगुडा वनपरिक्षेत्र पॅचमध्ये लपला असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तिकडे धाव घेऊन विशेष कारवाई केली.