संयुक्त प्रचारसभांमधून महायुतीच्या नेत्यांनी दिला ‘हम साथ-साथ है’चा संदेश

मोदीपर्वातच विकास साध्य होईल- खा.पटेल

गडचिरोली : महायुती-एनडीएच्या माध्यमातून राज्यात आणि देशातही पुन्हा मोदींच्या नेतृत्वातील सरकारला मतदारांचा कौल मिळेल आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार विराजमान होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे खा.अशोक नेते यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी गोंदियाचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी आ.संजय पुराम, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खा.पटेल म्हणाले, विकासाची दृष्टी ठेवून राज्यात भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्रित आले आहेत. गेल्या १० वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या प्रगतीत भर घालणारे अनेक उपक्रम मोदी सरकारने राबविले आहेत. मोदीपर्वच देशाला विकासाच्या वाटेवर नेईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम, खा.अशोक नेते यांनी आपल्या भाषणातून गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात झालेल्या विकास कामांची आणि सरकारच्या योजनांमुळे लोकांच्या जीवनमानावर कसा परिणाम झाला याची माहिती दिली. यावेळी महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.