गडचिरोली : माओवाद्यांच्या प्रभावक्षेत्रातील 20 गावांची काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा ठराव केल्यानंतर आणखी दोन गावांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यात भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस स्टेशन हद्दीतील पोयारकोठी व मरकणार या गावांचा समावेश आहे. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडील 2 भरमार बंदुका पोलिसांना केल्या सुपूर्द करत नक्षलवाद्यांना यापुढे कोणतेही सहकार्य करणार नाही, अशी भूमिका मांडली.
माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास वृद्धींगत झाला आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यात गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील मौजा पेनगुंडासह एकूण 20 गावांनी माओवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला होता.
दरम्यान दि.20 फेब्रुवारी रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत कोठी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोयारकोठी येथील ग्रामस्थांसाठी पोलीस दलामार्फत घेण्यात आलेल्या बैठकीदरम्यान गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन सर्वानुमते माओवाद्यांना गावबंदी करण्याचा ठराव प्रभारी अधिकाऱ्यांना सादर केला. यावेळी गावातील 70 ते 75 नागरीक उपस्थित होते.
तत्पूर्वी कोठी येथे ग्रामस्थांसाठी घेण्यात आलेल्या जनसंपर्क बैठकीदरम्यान नागरिकांना विविध शासकिय योजनांची माहिती देऊन सदर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर बैठकीदरम्यान मरकणार येथील नागरिकांनी सर्वानुमते माओवाद्यांना गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव कोठीच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सादर केला होता.
नागरिकांचा विश्वास जिंकण्यात यश
गडचिरोली जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अबुझमाड परिसरातील गावांमध्ये माओवाद्यांचा प्रभाव आहे. त्या गावांमध्ये आतापर्यंत माओवाद्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. पण पोलिसांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे महत्व पटवुन दिले. यासोबतच माओवाद्यांची भीती न बाळगता, त्यांच्या दमदाटीला न जुमानता आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करुन त्यांना कोणतीही मदत न करण्याविषयी विश्वास पटवून दिला. गावकयांनी यापुढे गावामार्फत माओवादी संघटनेला जेवण, रेशन, पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करणार नाही, गावातील नागरिक आणि युवक माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांच्या प्रशिक्षणाला जाणार नाही, गावातील जंगल परिसरात माओवाद्यांना थांबू देणार नाही, त्यांच्या मिटींगला जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते व कोठी येथील प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदीचा ठराव करणाऱ्या गावातील नागरिकांचे विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांनी अभिनंदन करत माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता गडचिरोली जिल्ह्राला माओवादमुक्त जिल्हा करण्यात प्रशासनाची मदत करावी, असे आवाहन केले.