अन् अहेरीचे अपर जिल्हाधिकारी चक्क सायकलने पोहोचले न.पं.कार्यालयात

ना शासकीय वाहन, ना वाहनचालक

अहेरी : जिल्ह्याच्या प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी दक्षिण गडचिरोलीचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथे अनक वर्षांपासून अपर जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे या पदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून अहेरीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना सुस्थितीतील शासकीय वाहन किंवा वाहनचालकही नाही. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी नगर पंचायतच्या विषय समित्यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी चक्क सायकलने न.पं.चे कार्यालय गाठले.

प्राप्त माहितीनुसार, अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याकडे अनेक महिन्यांपासून शासकीय वाहन नाही. यापूर्वी अपर जिल्हाधिकाऱ्यांना पुरविण्यात आलेले खासगी वाहन तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दुसरे वाहन पुरविण्याची कार्यवाही केलीच नाही. यासंदर्भात भाकरे यांनी वाहन आणि चालक पुरविण्याची लेखी विनंती प्रशासनाकडे केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

वास्तविक अपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एक शासकीय वाहन आहे, मात्र ते 2012 या वर्षातील आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील भौगोलिक परिस्थिती आणि रस्त्यांची दुरवस्था विचारात घेतल्यानंतर ते वाहन वापरण्यासारखे नाही, असे भाकरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तीन महिन्यांपूर्वी कळविले होते.

सध्या वाहन नसल्यामुळे शासकीय वसुली, गौण खनिज चोरीस प्रतिबंध याशिवाय विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोपविलेली जबाबदारी इत्यादी महत्वाची कामे पार पाडण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या प्रकाराबद्दल भाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातूनच सायकलने प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपवा

अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याकडे अहेरीसोबत सिरोंचा नगर पंचायतमधील स्थायी व विषय समित्यांच्या निवडणुकांसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र वाहनाअभावी सिरोंचा येथे जाऊन प्रक्रिया करणे शक्य नसल्यामुळे ही जबाबदारी वाहन असलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवावी अशी विनंती विजय भाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून केली आहे.