दानशूर गणेश मंडळ व राजे फाउंडेशनच्या पुढाकाराने झाली रुग्णवाहिकेची सोय

माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण

अहेरी : राजनगरीतील गणेशोत्सवाला श्रध्देसोबत सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे. यावर्षी अहेरी इस्टेटच्या राजमाता रुक्मिणीदेवी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन दानशूर गणेश मंडळ तथा राजे फाऊंडेशन अहेरी यांच्याकडून अहेरी उपविभागातील गरजू रुग्णांसाठी नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विश्वनाथरावबाबा आत्राम, अवधेशबाबा आत्राम, प्रविणरावबाबा आत्राम, ज्येष्ठ नेते प्रकाश गुडेल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते रवी नेलकुद्री, विनोद जिल्लेवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, पूर्वा दोंतुलवार, श्रीनिवास भंडारी, साई रामगिरवार यांच्यासह दानशूर गणेश मंडळाचे सदस्य तसेच गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहेरी क्षेत्रातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आणि मुलचेरा या पाच तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम गावातील गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण दररोज उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे दाखल होतात. अनेक वेळा त्या रुग्णांना रेफर करण्यात येते, परंतु रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. ही बाब दानशूर गणेश मंडळाने राजे फाउंडेशनचे प्रमुख अंब्रिशराव आत्राम यांना सांगितली. विषयाचे गांभीर्य ओळखून त्यांनी लगेच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आणि रुक्मिणीदेवींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकार्पण केले. अहेरी भागातील रुग्णांच्या सेवेकरीता रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने मोठी सोय झाली आहे.