प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा, त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवा

भामरागड येथील मेळाव्यात ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे निर्देश

भामरागड : लोकशाहीत राजकीय पक्षाची ताकद ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या क्षमतेवर आहे. पक्षाचे ध्येयधोरण आणि पक्षाच्या सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत नेण्याचे खरे काम कार्यकर्ते करतात. राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ओळख असून त्यांच्या ताकदीच्या भरवश्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊ शकते. पदाधिकाऱ्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करावी. सामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

भामरागड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुती सरकारकडून विविध शासकीय योजना राबविल्या जात आहेत. त्या सर्व योजना तालुक्यातील शेवटच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. वेळोवेळी पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन सामाजिक कार्य करावे, असेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी भाग्यश्री आत्राम यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व भामरागड तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
भामरागड तालुका मुख्यालयातील वन विभागाच्या विश्रामगृहात घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अनेक गावातील नागरिकांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांना पक्षाचा दुपट्टा देत स्वागत करण्यात आले.