भाजपची विधानसभा जनसंवाद यात्रा बुधवारी गडचिरोलीत येणार

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे भेटणार नागरिकांना

गडचिरोली : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून भाजपने जनसंपर्काच्या विविध योजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघांचा दौरा करणार आहेत. यात बुधवार, दि.२३ रोजी त्यांचा दौरा गडचिरोली येथे होणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.

याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी पक्षाने ३० मे ते ३० जूनपर्यंत महाजनसंपर्क अभियान राबविले. पण पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी हा कार्यक्रम पुढेही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे महाविजय २०२४ चा संकल्प करत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दि.२३ ला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या संवाद यात्रेवर येत आहेत. गडचिरोलीत स्वागत सोहळ्यानंतर ते त्रिमूर्ती चौक ते घिसुलाल काबरा यांच्या घरापर्यंत नागरिक आणि व्यापाऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर सुमानंद सभागृहात गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी १०० आणि इतर १०० अशा ४०० बुथ व शक्ती प्रमुखांसोबत संवाद साधतील. या संवादानंतर शहरातील काही महत्वाच्या लोकांची भेट घेऊन खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानाजवळील लोकसभा वॅार रूमचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.

गडचिरोलीतील कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळे ब्रह्मपुरी येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ब्रह्मपुरी, चिमूर आणि आमगाव या विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत दुपारी ४ वाजता संवाद साधणार असल्याचे यावेळी खा.नेते म्हणाले.

पत्रपरिषदेला लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, किसान आघाडीचे रमेश भुरसे, माजी सभापती रमेश बारसागडे, स्वप्निल वरघंटे, मुक्तेश्वर काटवे, केवश निंबोड, अनिल कुनघाडकर, संजीव सरकार आदी पदाधिकारी उपस्थित होते.