30 ते 68 टक्के कमी दराने करण्यात आलेल्या कामांची चौकशी सुरू

बांधकाम सचिव व मुख्य अभियंत्याचे निर्देश

गडचिरोली : जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या रस्ते व इतर कामांच्या निविदा 30 ते 68 टक्यापर्यंत कमी दराने मंजूर झाल्या. यामुळे कामांचा दर्जासुमार असल्याचा आरोप करीत भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी या कामांची चौकशी करण्याची मागणी मंत्रालयाकडे केली होती. त्यानुसार बांधकाम सचिव व मुख्य अभियंत्यांनी त्या कामांची चौकशीचे करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार चौकशी सुरू असल्याचे समजते.

अतिशय कमी दराने निविदा भरून कंत्राट मिळविण्याच्या प्रकारामुळे जिल्हाभरातील प्रामाणिक कंत्राटदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप खरवडे यांनी केला होता. बिलोची कामे करताना परफॅार्मन्स रक्कम भरायची असते ती नियमानुसार अनेकांनी भरलेली नाही. 30 टक्क्यांवरील बिलोच्या प्रत्येक कामाची मुख्य अभियंता नागपूर यांचेकडून मंजुरी घ्यायची असते, परंतु तशी मंजुरी घेतलेली नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार काही उपविभागात प्रकर्षाने घडला आहे.

मुख्य अभियंता नागपूर यांनी दक्षता व गुणनियंत्रण विभागास प्रत्येक कामावरील साहित्याचा दर्जा तपासून कारवाईचे आदेश दिले आहेत.