अन् अनियंत्रित दुचाकीसह बापलेक पुलावरून वैनगंगा नदीत कोसळले

वडीलाला वाचविण्यात यश, मुलगा बेपत्ता

गडचिरोली : आष्टीजवळच्या वैनगंगा नदीवरील पुलावरचा खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रिपल सीट जात असलेली दुचाकी अनियंत्रित होऊन पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली. या अपघातातील दोघे बचावले, मात्र तरुण मुलगा नदीत वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. अपघातग्रस्त तिघेही जण गोंडपिपरी येथून स्वगावी कुनघाडा (माल) येथे येत होते.

हा अपघात रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडला. किशोर गणपती वासेकर (३२ वर्ष) हा तरुण या अपघातानंतर नदीच्या प्रवाहात बेपत्ता झाला. तर त्याचे वडील गणपती वासेकर (६७) यांना नदीपात्रातून काढण्यात आले. शुभम रविंद्र बोलगोडवार (२९) हा पुलावरच पडल्याने बचावला.

चंद्रपूरकडून आष्टी, आलापल्लीकडे जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या वाहतुकीमुळे रस्त्यासोबत पुलावरही खड्डे पडले आहेत. या पुलासह रस्त्याची पुनर्बांधणी करावी अशी मागणी होत आहे.