वैनगंगा नदीत बोट उलटून सहा महिला बुडाल्या, एकीला वाचवण्यात यश

दोघींचे मृतदेह सापडले, चौघी बेपत्ता

गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत एक छोटी नाव (डोंगा) उलटल्याने सहा महिला नदीच्या प्रवाहात बुडाल्या. त्यापैकी दोघींचे मृतदेह सापडले असून चार महिलांचा शोध सुरू आहे. या सर्व महिला चामोर्शी तालुक्यातील गणपूर या गावातील आहेत. त्यामुळे गा गावावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (दि.२३) सकाळी गणपूर येथील सारूबाई कस्तुरे, जिजाबाई राऊत, रेवंता हरीदास झाडे, पुष्पा मुक्तेश्वर झाडे, माया अशोक राऊत, सुषमा सचिन राऊत आणि बुदाबाई देवाजी राऊत अशा सात महिला मिरची तोडाईच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात जाणार होत्या. नदीच्या पैलतीरावर जाण्यासाठी शॅार्टकट म्हणून या गावातील लोक नेहमीच डोंग्याचा वापर करतात. पण मंगळवारी गोसेखुर्द धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पाण्याला जास्त प्रवाह होता. याचा अंदाज न आल्याने नदीपात्राच्या मधोमध गेल्यावर नाव अनियंत्रित होऊन उलटली आणि नावाड्यासह सर्व महिला नदीपात्रात कोसळल्या.

अचानक नाव उलटल्यानंतर नावाड्याने कसाबसा स्वत:चा जीव वाचवला. याशिवाय सारूबाई कस्तुरे या महिलेलाही पाण्यातून बाहेर काढले. पण इतर सहा महिला बुडाल्या. माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. गडचिरोली, अहेरी आणि पोंभुर्णा येथील तीन पथकांनी मोटारबोटच्या सहाय्याने संध्याकाळपर्यंत महिलांचा शोध घेतला. यात जिजाबाई राऊत आणि पुष्पा मुक्तेश्वर झाडे या दोन महिलांचे मृतदेह हाती लागले. पण चार महिलांचा शोध लागला नाही.

राज्य आपत्ती सहाय्यता पथकाची (एसडीआरएफ) चमू रात्री उशिरा पोहोचत असून सकाळी ६ वाजतापासून ही चमू वैनगंगेच्या पात्रात त्या चार महिलांचा शोध घेणार असल्याचे एसडीपीओ मयुर भुजबळ यांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, एसडीपीओ मयुर भुजबळ हेसुद्धा घटनास्थळी पोहोचून मदतकार्यात सूचना करीत होते.

खासदार नेते यांची घटनास्थळावर धाव, गोसेखुर्दच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच खासदार अशोक नेते यांनी घटनास्थळ असलेल्या गणपूरजवळील नदीकाठावर जाऊन पाहणी केली आणि संबंधित महिलांच्या कुटुंबियांना व गावकऱ्यांना दिलासा दिला. या अपघातात बचावलेल्या सारूबाई कस्तुरे यांना चांगले उपचार देण्यासोबत बेपत्ता महिलांचा लवकर शोध घेण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

विशेष म्हणजे गोसेखुर्द धरणातून अचानक केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीचा प्रवाह वाढून ही दुर्घटना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गोसेखुर्दच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी खासदार नेते यांनी फोनवरून संपर्क करून त्यांना धारेवर धरले. नदीकाठावर राहणाऱ्या सर्व लोकांना पूर्वसूचना देऊन, सावध करूनच धरणातील पाणी सोडावे, असे सांगत या घटनेची चौकशी करा आणि संबंधितांवर कारवाई करा, असेही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, गणपूरचे सरपंच सुधाकर गदे, उपसरपंच जीवनदास भोयर, विनोद गौरकर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.