गडचिरोलीत आजपासून तीन दिवस ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग

२०० कलाकार, हत्ती-घोडेही राहणार

गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना फिरत्या रंगमंचावर साकारणारे, आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा’चे प्रयोग तीन दिवस गडचिरोलीत सादर होणार आहेत. विशेष म्हणजे राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून आयोजित केलेले हे महानाट्य तीन दिवस गडचिरोलीकरांना मोफत पहायला मिळणार आहे.

25, 26 आणि 27 जानेवारी यादरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) गडचिरोलीतील पटांगणात या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित केलेल्या या महानाट्यात उंट, घोडे यांचाही वापर होणार आहे. तसेच शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत. दररोज सायंकाळी 6 वाजता या महानाट्याचा प्रयोग गडचिरोलीकरांना मोफत पाहता येणार आहे.