ग्रंथालय आणि माहितीशास्राचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी डॅा.वासुर्के यांचे विशेष पुस्तक

शैक्षिक महासंघातर्फे शाल-श्रीफळाने सत्कार

गडचिरोली : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ (उच्च शिक्षा संवर्ग), नवी दिल्ली संलग्नित अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ गोंडवाना विद्यापीठ यांच्या वतीने प्रा.डॉ.रमेश सोनटक्के यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ तथा “इमर्जिंग ट्रेन्डस ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेन्टर्स” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गडचिरोलीतील एका हॅाटेलमध्ये झाला. ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तथा गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचचे माजी अध्यक्ष डॉ.पी.अरुणाप्रकाश होते. सत्कारमूर्ती म्हणून प्रा.डॉ. रमेश सोनटक्के, तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे अधिष्ठाता डॉ.चंद्रमौली, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री डॉ.विवेक जोशी, महामंत्री डॉ. रूपेंद्रकुमार गौर, कार्याध्यक्ष डॉ.सचिन वझलवार आदी उपस्थित होते.

प्रा.डॉ.रमेश सोनटक्के हे ग्रंथपालपदाचा 28 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून 30 एप्रिल 2024 ला सेवानिवृत्त झाले. त्यांनी जेएसपीएम महाविद्यालय धानोरा आणि सद्‌गुरू साईबाबा महाविद्यालय आष्टी येथे ग्रंथपाल म्हणून सेवाकार्य केले. या शैक्षणिक कार्यासोबतच त्यांनी विविध क्षेत्रात लोकोपयोगी कार्यसुद्धा केले आहे. वरील पुस्तकाच्या निर्मितीत सहलेखक म्हणून त्यांचे योगदान आहे.

यावेळी त्यांना अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघातर्फे शाल, श्रीफळ, भेटवस्तू, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र बहाल करून त्यांचा गौरव करण्यात आला. सहमंत्री डॉ महेशचंद शर्मा यांनीही शाल, श्रीफळ देऊन डॉ.रमेश सोनटक्के यांचा वैयक्तिक सत्कार केला.