चाचा नेहरु बालमहोत्सवात अनाथ, निराधार मुलांच्या सुप्त गुणांना वाव

घोटमध्ये रंगल्या तीन दिवसीय स्पर्धा

गडचिरोली : बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय तथा स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावर्षीही या तीन दिवसीय जिल्हास्तरिय बाल महोत्सव आणि क्रीडा स्पर्धांची सांगता झाली.

महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने घोट येथील अहिल्यादेवी बालसदनात आयोजित चाचा नेहरु बाल महोत्सव व क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गडचिरोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण फेगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून घोटच्या सरपंच रुपाली दुधबावरे, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष वर्षा मनवर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, अध्यक्ष लोकमंगल संस्था घोटच्या शायनिक गर्वासिस, संस्थेच्या सचिव मर्लीण पारेकाळण, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, परिविक्षा अधिकारी विलास ढोरे, विजय पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश भांदककर यांनी तर आभार विनोद पाटील यांनी मानले.

सदर बाल महोत्सवात शासकीय संस्था व स्वयंसेवी संस्थेमधील प्रवेशित मुली, तसेच स्थानिक शाळांमधून नवोदय मराठी उच्च प्राथमिक तथा हायस्कूल, प.पुज्य महात्मा गांधी विद्यालय घोट, केंद्रिय नवोदय विद्यालय घोट, जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय घोट, तसेच अहिल्यादेवी बालगृह घोट येथील एकूण २६४ बालके विविध स्पर्धेत सहभागी झाली.