पोटेगावात भरली शासकीय योजनांची जत्रा

खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी'

गडचिरोली : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यासाठी लागणारा वेळ आणि मनस्ताप टाळण्यासाठी पोटेगाव येथे महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण केले. तसेच या माध्यमातून विविध योजनांचे स्टॉल उपलब्ध केले होते. यानिमित्ताने केंद्र व राज्य शासन आपल्या दारी आले असून जनतेनी शासकीय विविध योजनांची माहिती घेऊन या महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी उद्घाटक म्हणून बोलताना केले.

यावेळी खा.नेते म्हणाले, सर्व नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या योजनांचा लाभ सर्वांना मिळवून देणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी प्रामुख्याने तहसीलदार महेंद्र गणवीर, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, गटशिक्षणाधिकारी राऊत, पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश काळे, वैद्यकिय अधिकारी डॉ.कुमरे, पोटेगांवच्या सरपंच अर्चना सुरपाम, सावेलाच्या सरपंच सुरेखा मडावी, मारदाच्या सरपंच मनोहर पोटावी, पोलीस पाटील किशोर नरोटे, मुख्याध्यापक बल्लमवार, वनपरिक्षेत्राधिकारी तांबरे, राजोलीच्या सरपंच कांता हलामी, सरपंच देविदास मडावी, तसेच शासकीय अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.