देसाईगंज : येथील हनुमान वॅार्डमधील श्रेयस चंद्रकुमार दुबे या 12 वर्षीय बालकाला गुंगीचे औषध देऊन त्याचे अपहरण करून रेल्वेने घेऊन जात होते. पण नंतर बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पोलिसांनी त्याची सुटका केली, असा मॅसेज गुरूवारी (दि.16) संध्याकाळी व्हॅाट्स अॅपवर व्हायरल झाल्याने पालकवर्गात एकच खळबळ उडाली होती. परंतू देसाईगंज पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर खरा प्रकार तसा नसून तो बालक रागाच्या भरात गेला होता, असे स्पष्ट झाले आहे.
श्रेयस हा सायकलने ट्युशनला जात असताना 3 ते 4 च्या संख्येने असलेल्या अपहरणकर्त्यांनी त्याला गुंगीचे औषध देऊन सोबत नेले आणि रेल्वेने त्याला घेऊन जात होते. पण एका युवकाच्या सतर्कतेने त्याला रेल्वे पोलिसांच्या मदतीने बल्लारशाह स्थानकावर उतरविण्यात आले, असेही त्या व्हायरल मॅसेजमध्ये नमुद केले होते. त्यामुळे लहान मुले असणाऱ्या देसाईगंज शहर व परिसरातील पालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. विशेष म्हणजे यासंदर्भात देसाईगंज पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नव्हती.
दरम्यान समाज माध्यमांत व्हायरल होत असलेल्या त्या मॅसेजची सत्यता पडताळण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यात श्रेयस हा बल्लारपूर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असून त्याचे पालक त्याला आणण्यासाठी गेले होते. दरम्यान पोलिसांनी विश्वासात घेऊन बालकासह त्याच्या पालकांकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली असता रागाच्या भरात श्रेयस निघाला होता, पण ही बाब लक्षात आल्यानंतर बल्लारशाह स्थानकावर त्याला पोलिसांनी उतरवले होते. परंतू नातेवाईक किंवा हितचिंतकांनी काळजीपोटी चुकीच्या पद्धतीने मॅसेज सोशल मीडियावर टाकल्याने तो व्हायरल झाला होता. यासंदर्भात मुलाचे वडील चंद्रकुमार रेखमप्रसाद दुबे यांनीही अपहरण झालेले नव्हते, असे स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीही देसाईगंज पोलिसांच्या हद्दीत अशाच पद्धतीने तीन वेगवेगळ्या घटनेत छोट्या-छोट्या कारणासाठी बालके रागाच्या भरात घरून निघाली होती, पण घरच्या लोकांच्या भितीमुळे त्यांनी अपहरणाचे खोटे कथानक रचले होते. त्यामुळे कोणतीही सत्यता तपासून न पाहता चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवल्याने गैरसमज आणि भितीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे देसाईगंज (वडसा) शहर किंवा परिसरात मुलांचे अपहरण करणारी अशी कोणतीही टोळी नसून नागरिकांनी विनाकारण अस्वस्थ होऊन घाबरू नये, असे आवाहन देसाईगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.निरीक्षक अजय जगताप यांनी केले आहे.
कोणाला कुठे काही संशयास्पद प्रकार दिसून आल्यास देसाईगंज पोलीस स्टेशनला (8329295051) किंवा आपत्कालीन हेल्पलाईनला (112) किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला (07132350001) कळवावे, असेही आवाहन ठाणेदार जगताप यांनी केले आहे.