गडचिरोली : जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी त्याठिकाणी विविध सोयीसुविधा निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंगळवारी दिले. पर्यटनस्थळांचा विकास, प्रक्रिया उद्योगांना चालना आणि रोजगारनिर्मिती यासंदर्भात नाविन्यपूर्ण कामे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यास त्यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले आहेत.
विशेषतः “क” वर्ग पर्यटनस्थळांमध्ये टिपागड, झाडापापडा, सिरोंचा त्रिवेणी संगम, कमलापूर हत्ती कॅम्प, लेखामेंढा, चपराळा अभयारण्य, अरततोंडी महादेव, कोठारी बौद्ध स्तुप, तुमडी, आष्टी येथील निसर्गरम्य परिसर आणि मुतनूर या 11 ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य देऊन पर्यटकांना अधिक आकर्षित करण्याचे व त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.