घरकुलासाठी रेती वाहतुकीच्या पासेसचा गैरवापर तर नाही ना?

अहेरीत कडक कारवाईचे निर्देश

अहेरी : घरकुलासाठी निर्गमित रेती वाहतूक पासेसचा गैरवापर करून त्याआड रेती तस्करी होणार नाही यासाठी अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

घरकुल बांधकामासाठी तत्परतेने आणि पारदर्शक पद्धतीने पासेस निर्गमित करण्याची कार्यपद्धती निर्धारित करून देण्यात आली. तसेच त्याचा गैरवापर होणार नाही यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना कडक कारवाई करण्याचे सविस्तर निर्देश अपर जिल्हाधिकारी भाकरे यांनी दिले.

मागील वर्षीसुद्धा जिल्ह्यातील रितीघाटांचा लिलाव झाला नसल्यामुळे घरकुलांना झिरो रॉयल्टी तत्त्वावर 5 ब्रास मर्यादेत रेती उपलब्ध करून देण्याची कार्यवाही भाकरे यांच्याकडे अतिरिक्त जिल्हाधिकारी गडचिरोली या पदावर अतिरिक्त कार्यभार असताना झाली होती.

रमाई, शबरी आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अहेरी, भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा तालुक्यांमध्ये नगर पंचायतींचे मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रेतीची मागणी प्राप्त झाली आहे. त्यानुसार घरकुलांसाठी वाहतूक पासेस निर्गमित केल्या जात आहेत.