नजरेसमोर झालेल्या पतीच्या आकस्मिक मृत्यूचा धक्का, पत्नीनेही त्यागला देह

नागपुरातील उपचारांनाही दिला नाही प्रतिसाद

देसाईगंज : ते दोघेही शरीराने सुदृढ. स्वत:च्या शेतात राबून मेहनत घेणारे. पण नियतीला त्यांची ही जोडी पहावली नाही. शेतावर काम करताना अचानक पतीची प्रकृती बिघडली आणि उपचार घेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या नजरेसमोर पतीचा असा आकस्मिक मृत्यू होणे पत्नीला सहन झाले नाही, आणि तिचीही प्रकृती बिघडली. त्यातच उपचारादरम्यान तिनेही देहत्याग केला.

मोरेश्वर मारूती मुंडले (५२) आणि मिनाक्षी (४५) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव चोप येथील दाम्पत्याची ही कहाणी परिसरात चर्चेचा विषय झाली आहे. गेल्या २२ आॅगस्ट रोजी मारूती मुंडले पत्नी मिनाक्षी यांच्यासह सकाळी पिकांना रासायनिक खत देण्यासाठी शेतावर गेले होते. त्याच ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडून मोरेश्वर यांचा मृत्यू झाला. आपल्या नजरेसमोर पतीचा अचानक झालेला मृत्यू पाहून मिनाक्षी बेशुद्ध झाल्या. त्यांना त्याच अवस्थेत उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे नेण्यात आले. पण प्रकृतीत सुधारणा होण्याएेवजी आणखीच बिघडत असल्याचे पाहून उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. तेथील खासगी रुग्णालयात मेंदूवर शस्रक्रिया करण्यात आली. पण पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून मिनाक्षी सावरल्या नाही. अखेर शनिवारी दुपारी त्यांनी देह त्यागून ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’चा प्रत्यय दिला.

मिनाक्षी मुंडले माजी ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगा आणि सासू असा परिवार आहे.