अर्भकाची हत्या करून मृतदेह नदीत फेकणाऱ्या तरुणीसह प्रियकराला अटक

अनैतिक संबंधाचे पाप लपविण्याचा प्रयत्न फसला

गडचिरोली : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बाळाची हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकणाऱ्यांचा शोध लावण्यात कुरखेडा पोलिसांना यश आले. गेल्या १६ आॅगस्ट रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी कुमारी मातेसह तिचा प्रियकर आणि त्याला मदत करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सती नदीच्या पात्रात मासे पकडताना जाळ्यात अर्भक आल्याने ही घटना उघडकीस आली होती.

त्या अर्भकाचा पिता असलेल्या संतोष हर्षे (२८) रा.गिलगाव या युवकासह अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या दिलीप रोकडे (४०) रा.कुरखेडा आणि अर्भकाची माता चांदनी (२२) हिला पोलिसांनी अटक केली. कुरखेडा न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरिक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा छडा लावण्यात आला.

आरोपी संतोष याच्यासोबत असलेल्या संबंधातून त्या अर्भकाचा जन्म झाला होता. हर्षल आपल्याला पती म्हणून स्वीकारेल असे तिला वाटत होते. त्यातूनच तिने पोटातील अर्भकाला वाढू दिले. पण त्यांनी लग्न करून त्या अर्भकाचे कायदेशिर माता-पिता होण्याएेवजी त्यालाच संपवले. कुरखेडानजिकच्या सती नदीच्या कुंभीटोला घाटावरील पात्रात दि.१७ आॅगस्टला मासेमारी करणाऱ्या तरुणांच्या जाळ्यात ते मृत अर्भक लागले आणि या प्रकरणाचा बोभाटा झाला.

मृत अर्भकाच्या गळ्याभोवती बुटाची लेस होती. शिवाय डोक्यावरही मार होता. त्यामुळे गळा आवळून त्याचा जीव घेतल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आणि अर्भकाच्या माता-पित्याला शोधून काढले.