दहीहंडीचे थर पाहण्यासाठी गडचिरोलीत उसळली आबालवृद्धांची गर्दी

जोखमीमुळेच १० लाखांचे विमा कवच- खा.नेते

गडचिरोली : गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन केले होते. गडचिरोलीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अभिनव लॉनच्या प्रांगणात आयोजित दहीहंडी जिल्ह्यात सर्वात मोठी ठरली. दहीहंडीचे थरावर थर लावण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी प्रयत्न केले. यावेळी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी गडचिरोलीकरांनी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, बालगोपाल, युवक वर्ग मोठ्या उत्साहाने दहीहंडीत सहभागी होतात. या साहसी खेळात सांघिक कौशल्य प्रतिबिंबीत होते. एकमेकांच्या सहाय्याशिवाय दहीहंडीपर्यंत पोहोचता येत नाही. सोबत पाण्याचा वर्षावही केला जातो. त्यामुळे या खेळातील जोखीम वाढते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने याला साहसी खेळाचा दर्जा देऊन १० लाखांचे विमा कवच दिले. असे असले तरीही गोविंदा पथकाने हा खेळ सावधगिरीने खेळावा, असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, गडचिरोलीचे ठाणेदार अरुण फेगडे, सामाजिक नेते रामायण खटी, भाजपचे जेष्ठ नेते रमेश भुरसे, तसेच भारत खटी, अनिल कुनघाडकर, मुक्तेश्वर काटवे, नितेश खडसे, अनिल तिडके, तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सदस्य व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.