सांस्कृतिक कार्यक्रमांसह दहीहंडीत पहिल्यांदाच युवतींनी घेतला सहभाग

माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचा पुढाकार

सिरोंचा : येथील तहसील कार्यालय परिसरात माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात सांस्कृतिक व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात 8 गोविंदा पथक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच गोविंदा पथकात युवतींनी सहभाग घेतल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, ठाणेदार कुमारसिंग राठोड, नगरसेवक नागेश्वर गागापूरवार, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते रवी रालाबंडीवार, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, सतीश भोगे, सतीश राचर्लावार, राकॉचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, गणेश बोधनवार, नगरसेविका नुसरत बाबर शेख, रवी सुलतान, फिरोज खान आदी उपस्थित होते.

बालगोपाल मटकी फोड मंडळ सिरोंचातर्फे आयोजित सांस्कृतिक तथा दहीहंडी कार्यक्रमासाठी माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडून प्रथम पारितोषिक 31 हजार, तर द्वितीय पारितोषिक 11 हजार रुपये देण्यात आले. जिल्हा परिषद हायस्कूल सिरोंचा संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले. वाल्मिकी संघाने दुसरे पारितोषिक पटकाविले. युवतींचा एकच संघ सहभागी झाल्याने त्यांना विजेतेपद देण्यात आले. तालुक्यातील विविध गावातून बाल गोपालांच्या वेशभूषेत संस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.