ग्राम पंचायतींमध्ये कार्यरत शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांना नियमित करा

आ.डॉ.देवराव होळी यांना संघटनेचे निवेदन

गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये मानधनावर कार्यरत शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांना शासनाने वेतनश्रेणी निश्चित करून त्यांना सेवेत सामावून घ्यावे आणि नियमित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यासंदर्भातील निवेदन त्यांनी आ.डॉ. देवराव होळी यांना दिले. त्यावर या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॅा.होळी यांनी दिले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन नागपूर या संघटनेचे अध्यक्ष मारोती पुल्लीवार, सचिव नेताजी गंडाटे, तालुकाध्यक्ष सुमेथ हर्षे, सचिव गुरुदेव नैताम यांच्या नेतृत्वात संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ.डॉ.होळी यांच्याशी जनसंपर्क कार्यालयात विस्तृत चर्चा केली. शिपाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिक्षणाानुसार वर्ग ३ व वर्ग ४ मध्ये समायोजन करण्यात यावे, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीसच्या धर्तीवर एकरकमी सानुग्रह मदत देण्यात यावी इत्यादी मागण्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली.