महिलांनी कोणताही भेदभाव न ठेवता स्वत:सोबत कुटुंबाची प्रगती साधावी

सिरोंचा येथे भाग्यश्री आत्राम यांचे आवाहन

सिरोंचा : महिला सबळीकरण, सक्षमीकरण आणि आत्मविश्वासवृद्धी या तिसुत्रीचा उपयोग करून आपल्यासोबत कुटुंबाचा विकास साधावा. महिलांनी कोणताही भेदभाव न ठेवता स्वतःला प्रगत करावे. हळदीकुंकूसारख्या कार्यक्रमाच्या माध्यमांतून महिलांनी एकजूट व्हावे, असे आवाहन माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

रविवारी (दि. ४) सिरोंचा तालुका मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पुजनाने करण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो महिला उपस्थित होत्या.

यावेळी आयोजित विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तसेच विविध स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांकडून एकमेकांना वाण देण्यात आले. लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला सोन्याची नथ व पैठणी बक्षीस देण्यात आली. काही महिलांना लकी ड्रॉ द्वारे चांदीचे नाणे आणि पैठणी देण्यात आली. विशेष म्हणजे विधवा स्त्रियांचा देखील हळदीकुंकू आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.