पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत रोजगार व स्वयंरोजगार मेळावा

'पंखांना शिक्षणाचे बळ देऊन भरारी घ्या'

गडचिरोली : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या गडचिरोली भेटीच्या दुसऱ्या दिवशी दि.१८ ला गरजू व सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना त्यांनी मार्गदर्शन केले. तुम्ही चांगले शिक्षण घेतले तर तुमचा परिवार, समाज आणि पर्यायाने देश उन्नत होणार आहे. तुम्हाला जे बनायचे आहे, तुमचे जे ध्येय आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. तुमच्या पंखांना शिक्षणाचे बळ देऊन सक्षम व्हा आणि उंच भरारी घ्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित युवक-युवतींना केले.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयात कौशल्य विकास केंद्र (स्किलिंग इन्स्टिटयुट)ची सुरुवात करण्यात आली. आहे. यातूनच अत्याधुनिक कोर्सेसचे प्रशिक्षण देता यावे याकरीता पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते स्किलिंग इन्स्टिटयुट अंतर्गत संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, पोलिस अधीक्षक (विशेष कृती दल, नागपूर) डॉ.संदीप पखाले प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यातील युवक-युवतींकरिता पोलिस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्रातील विविध ठिकाणाहून दुर्गम-अतिदुर्गम भागातील 600 वर युवक–युवती उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात उपस्थित विविध प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र आणि विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रोजेक्ट प्रयास अंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणवंतांना पोलिस महासंचालकांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम बक्षिस देण्यात आले.

प्रास्ताविकात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली पोलीस दल राबवित असलेल्या विविध कल्याणकारी उपक्रम आणि 10,400 पेक्षा अधिक युवक-युवतींना दिलेल्या रोजगार व स्वयंरोजगाराबाबत माहिती दिली.

कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक धनंजय पाटील, भारत निकाळजे, चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.