गडचिरोली : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचे सुपूत्र वैज्ञानिक डॉ.प्रकाश हलामी यांना त्यांच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल संशोधनातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
सदर परिषद संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोपरगाव, जिल्हा अहमदनगर येथे झाली. “शास्वत जैव संसाधने आणि जैवअर्थव्यवस्थेसाठी जैवतंत्रज्ञान संशोधनातील नवकल्पना” या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन गांधीनगरचे संचालक, डॉ.अरविंद रानडे यांनी केले. यामध्ये देश-विदेशातील प्रतिनिधी उपस्थित होते.
अनेक क्षेत्रामध्ये मूळ उत्पादनांची निर्मिती होताना काही टाकाऊ वस्तू तयार होतात. त्या वस्तूंचा योग्य प्रकारे वापर केला गेल्यास त्यापासून आपण आर्थिक लाभ मिळवू शकतो, असे डॉ. हलामी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. डॉ.प्रकाश हलामी यांच्या जैवतंत्रज्ञानातील आधुनिक पद्धतीवर ‘जीन एडिटिंग इन बॅक्टेरिया’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जास्त उत्पादन क्षमता असणाऱ्या पिकांतील जनुक दुसऱ्या पिकामध्ये वापरून जास्त उत्पादन क्षमता असणारी जात कश्याप्रकारे विकसित करता येईल, याचे संशोधन केल्या जाते.
डॉ.हलामी गडचिरोली जिल्ह्यातील खरमतटोला या गावाचे रहिवासी असून मागील तीन दशकांपासून जैवंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. त्याचबरोबर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र यामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याने याअगोदर त्यांना जी.बी.मांजरेकर पुरस्कार देण्यात आला आहे. सद्या ते वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था म्हैसूर येथे मुख्य वैज्ञानिक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.