गडचिरोली : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आजपासून गडचिरोलीत जिल्हास्तरीय ‘मिनी सरस’ हे विक्री व प्रदर्शन भरणार आहे. 6 ते 10 मार्च या कालावधीत चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉनवर भरणाऱ्या या प्रदर्शनात जिल्हयातील 75 स्वयंसहाय्यता समुह (बचत गट) सहभागी होणार आहेत.
या प्रदर्शनीमध्ये मध, जांभूळ व सीताफळ प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ तसेच मोहाचे वेगवेगळे पदार्थ, लाकडी शोभेच्या वस्तू, आंब्यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ, मच्छी लोंचे यांचा समावेश असणार आहे.
प्रदर्शनादरम्यान ग्रामीण भागातील अस्सल गावरान पध्दतीच्या विविध पदार्थाची चवही गडचिरोलीकरांना चाखायला मिळणार आहे. याशिवाय लाकडी वस्तू, दागिने, ड्रेस मटेरिअल, घरगुती मसाले, गावरान दाळी, कुरडया, पापड्या, आंबा लोनचे, मच्छी लोनचे, व्हेज-नॉनव्हेज जेवणाची दुकाने लावण्यात येणार आहे. भजी-भाकरी, पुरणपोळी, ज्वारी भाकरी, भरीत भाकरी, चिकन भाकरी, इडली, अप्पे, साबुदाना वडे, मोहाचे विविध पदार्थ असे अनेक भोजन व नास्त्याचे स्टॉल लावले जातील.
याशिवाय दररोज संध्याकाळी सांस्कृतिक मेजवाणी यामध्ये लोकसंगीत, महिलांचे डान्स, आदिवासी संस्कृतीदर्शन कार्यक्रम, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे डान्स असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
ग्रामीण महिलांना प्रोत्साहन द्या
ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातुन उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी हे प्रदर्शन व विक्री 6 ते 10 मार्च पर्यत राहणार आहे. सर्वांनी या प्रदर्शनाला भेट देवून महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान सहसंचालक तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार यांनी केले आहे.