जिल्हास्तरीय युवा महोत्सवात दिसणार युवक-युवतींमधील कलाकौशल्य

मंगळवारी क्रीडा संकुलात आयोजन

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आणि जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.28 रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध कलाप्रकारांमध्ये जिल्हाभरातील युवक-युवतींमधील कलाकौशल्याचे प्रदर्शन होणार आहे.

जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतिक भवन, गडचिरोली येथे सकाळी १० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. युवकांचा सर्वांगिन विकास करणे, संस्कृती व परंपरेचे जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सप्तकलागुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे याकरीता या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित केले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये समुह लोकनृत्य, वैयक्तिक (सोलो) लोकनृत्य, लोकगीत, सोलो लोकगीत, कौशल्य विकासमध्ये कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), फोटोग्राफी, संकल्पना आधारीत स्पर्धेमध्ये तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान, युवा कृती या कार्यक्रमाअंतर्गत हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रोडक्ट अशा स्पर्धा होणार आहेत.

प्रथम क्रमांक प्राप्त करणारे युवक-युवती किंवा संघ यांना विभागस्तरावर आयोजीत युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता पाठविण्यात येईल. या युवा महोत्सवामध्ये 15 ते 29 या वयोगटातील युवक-युवती सहभागी होणार आहेत.

जिल्हास्तरावर सहभागी होणाऱ्या युवक युवतींकरीत यावर्षीपासून प्रथम, द्वितीय व तृतीय प्राविण्य प्राप्त
करणाऱ्या वैयक्तिक / सांघिक कलाप्रकारानुसार रोख बक्षिसे तसेच सहभागी युवक-युवतींना कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी सांगितले.