गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकातील जवानांना आपले कर्तव्य बजावत असताना सणासुदीच्या दिवसांमध्ये देखील आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून दिवस-रात्र जंगलात घालवावी लागते. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत विशेष अभियान पथकातील जवानांसाठी शनिवारी (दि.११) दिवाळी फराळ, मिठाई आणि फटाके वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जवानांशी संवाद साधला. तसेच उपस्थित सर्व जवानांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, गडचिरोली पोलिस दलाच्या जवानांना सणाच्या दिवसातही कुटुंबियांसोबत राहता येत नाही. तरीही ते आपल्या कर्तव्यात हयगय न करता आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असतात. त्यामुळे गडचिरोली पोलिस दलाला नेहमी त्यांचा अभिमान असेल, असे सांगत पोलिस अधीक्षकांनी सर्व जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि स्वत:च्या हाताने फराळ, मिठाई व फटाक्यांचे वाटप केले.
या कार्यक्रमाकरिता पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, तसेच विशेष अभियान पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि कल्पेश खारोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
(विविध मान्यवरांच्या दिवाळी शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)