दीपावली सांध्यमैफलीतील हिंदी गितांनी दिला गतकाळातील आठवणींना उजाळा

गडचिरोलीकर रसिक तृप्त, पहा व्हिडीओ झलक

गडचिरोली : ‘दिवाळी पहाट’च्या निमित्ताने दरवर्षी गडचिरोलीकर रसिक श्रोत्यांना संगीतमय मेजवाणी देणाऱ्या अजब-गजब विचार मंचने यावर्षी पहाटसोबत संध्याही संगीतमय करत गडचिरोलीकरांचा चांगलेच तृप्त केले. एकापेक्षा एक सरस गितांच्या सादरीकरणाने रंगलेली ही संगीत मैफल रसिकांसाठी अविस्मरणीय अशी ठरली.

दीपावलीच्या पहिल्या दिवसाची अर्थात वसुबारसेची सांज अवतरली ती सुमधुर सुरांचा नजराणा घेऊनच. अजब-गजब विचार मंचाची मागील १० वर्षांची परंपरा असलेल्या संगीत मैफलीतील सांध्यमैफलीत सप्तसुरांचे लख्ख चांदणेच उधळण्यात आले. विशेष म्हणजे यंदा एक संध्याकाळी व एक पहाटे अशा दोन स्वरमैफलींची मेजवानी रसिकांना मिळाली. सप्तसुरांचा हा डबल धमाका अवघी गडचिरोली नगरीच सूरमयी करणारा ठरला.

यंदाच्या संगीत महोत्सव -२०२३ अंतर्गत पहिल्या सांध्यमैफलीत ६०, ७०, ८० च्या दशकातील अवीट गोडीच्या हिंदी गीतांचा नजराणा पेश करण्यात आला. स्थानिक विद्याभारती हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित या मैफलीचा प्रारंभ शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नामवंत पं.गुणवंत घटवाई यांनी ‘वक्रतुंड महाकाय’, या गणेश स्तवनाने केला. त्यानंतर गायक सारंग जोशी यांनी ‘शिर्डीवाले साईबाबा आया है तेरे दर पे सवाली’ ही कव्वाली सादर करत मैफलीवर सुरांचे गारुड घातले. त्यानंतर गायिका श्रेया खराबे-टांकसाळे यांनी ‘रात का समाॅं झुमे चंद्रमा’ गाताच अनेक रसिक बाॅलीवुडमधील बहारदार गीतांच्या सुवर्णकाळातच पोहोचले. मुकूल पांडे यांनी गायलेलं ‘मै जिंदगीका साथ निभाता चला गया’ हे गीत स्वर्गीय मोहम्मद रफी यांची आठवण जागवून गेलं.

गायिका राधा ठेंगडी यांनी ‘पिया तोसे नैना लागे रे’ गात पुन्हा सुरांची पखरण केली. गडचिरोलीचीच सुपुत्री शास्त्रीय गायिका निकिता चंदनखेडे हिच्या ‘लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो’, या गीतातील आर्त स्वरांनी रसिकांना व्याकुळ केलं. ‘गाता रहे मेरा दिल’, ‘छुप गये सारे नजारे ओय क्या बात हो गई’, ‘हसता हुवा नुरानी चेहरा’ हे द्वंद्व गीत, ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू’ या जुन्या गीतासह अलीकडच्या काळातील ‘हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए’ हे सुमधुर गीतही सादर झाले. शिवाय जीवनाची नश्वरता प्रभावीपणे कथन करणारी ‘चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा’ ही कव्वालीही सादर झाली.

पं.गुणवंत घटवाई यांनी उत्तरार्धात अतिशय मिष्कीलपणे गायलेल्या ‘ओ मेरी जोहराजबी’ या गीतानेही रंगत आणली. ६०, ७० च्या दशकातील काही गीतांच्या दोन ते चार ओळी गात सुरांचा गुलदस्ताच रसिकांच्या हाती देत या मैफलीची सांगता झाली. मैफलीला प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे, शमशेर खान पठाण, प्राचार्य लीना हकीम, डाॅ. मिलिंद नरोटे, अरविंद कात्रटवार, संतोष तंगडपल्लीवार, रवी वासेकर, राजू बोमनवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मैफलीसाठी अजब-गजब विचार मंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सचिन मून, सतीश विधाते, नंदकिशोर काथवटे, विश्राम होकम, सुभाष धंदरे, मिलिंद उमरे, सूरज खोब्रागडे, प्रवीण खडसे, दत्तू सुत्रपवार, डॉ.प्रशांत चलाख, प्रतीक बारशिंगे आदींनी सहकार्य केले.

(विविध मान्यवरांच्या दिवाळी शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)