अहेरी नगरातून भीमज्योत रॅली काढून महामानवाला वाहिली श्रद्धांजली

बुद्ध विहाराच्या प्रांगणात महापरिनिर्वाण दिन

अहेरी : येथील बुद्ध विहाराच्या पटांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने 6 डिसेंबरला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सायंकाळी शहरातून ज्ञान प्रसारक मंडळ व बोधीसत्व बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळ तथा यशोधरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भीमज्योत रॅली काढण्यात आली.

सकाळी उपासिका कमल अलोणे यांच्या हस्ते निळा ध्वज फडकावून सामूहिकरित्या त्रिशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोणे व राहुल गर्गम यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला.

रॅलीत सामूहिक त्रिशरण-पंचशील म्हणत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच दोन मिनिटांचे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भीमज्योत रॅलीत मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व बहुसंख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.