मार्कंडेश्वरासह जिल्ह्यातील सर्व शिवालयांत महाशिवरात्रीच्या यात्रा उत्सवाला सुरूवात

गडचिरोली विभागाच्या ६९ अतिरिक्त बसेस

गडचिरोली : जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिरासह भंडारेश्वर, चपराळा येथे गुरूवारपासून महाशिवरात्रीच्या यात्रा उत्सवाला सुरूवात झाली. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक जातात. त्यासाठी गडचिरोली एसटी विभागाअंतर्गत गडचिरोली, अहेरी आणि ब्रह्मपुरी या तीनही आगारामिळून ६९ जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिरोलीतून दर अर्ध्या तासाने मार्कंडासाठी बसफेरी सोडली जाणार आहे.

महाशिवरात्र शुक्रवारी असली तरी गुरूवारपासूनच मार्कंड्यात गर्दी सुरू झाली आहे. महाशिवरात्री यात्रा उत्सवात या ठिकाणी विदर्भातून आणि दुसऱ्या राज्यातूनही भाविक येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने अतिरिक्त बसफेऱ्यांची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन एसटीच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे यांनी केले आहे. गडचिरोलीपासून थेट मार्कंडापर्यंत ७० रुपये तिकीट दर आकारले जात आहे. या यात्रा उत्सवातून एसटी महामंडळाला यावर्षी ७ लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

मार्कंडेश्वर मंदिरात पहाटे महापुजा होणार आहे. त्यानंतर दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी रांग राहिल. यात्रा उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर अस्थायी दुकाने लागली आहेत.