सिरोंचा येथील आरोग्य शिबिरात 927 रुग्णांची केली मोफत तपासणी

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा उपक्रम

सिरोंचा : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात आणि माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, तसेच डॉ.मिताली आत्राम यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच सिरोंचा येथे मोठ्या स्वरूपात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. ग्रामीण रुग्णालय परिसरात झालेल्या या शिबिरात 927 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

अहेरी विधानसभा क्षेत्र हे अतिदुर्गम भाग असल्याने येथील विविध आजारांच्या रुग्णांना शहरात जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात ‘मावा स्वास्थ्य मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत खेड्यापाड्यातील रुग्णांचा शोध घेऊन योग्य औषधोपचार केले जात आहे. सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागातील रुग्णांना देखील उपचार व सल्ला मिळावा या उदात्त हेतूने माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम तसेच डॉ.मिताली आत्राम यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

विशेष म्हणजे या शिबिरात डॉ.ध्रुबोज्योती साहा, डॉ.स्नेहा अग्रवाल यासह इतर तज्ज्ञ डॉक्टरांनी व त्यांच्या चमूने आरोग्य तपासणी करून मोफत उपचार केले. यातील जवळपास 327 रुग्णांना नेत्र विकार असल्याचे आढळले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने त्या रुग्णांना पुढील तारीख देऊन नागपूर येथे पाठवून लेजर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यापूर्वी देखील विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील बऱ्याच रुग्णांवर उपचार देखील झाला. अनेक वयोवृद्धांना यामुळे दृष्टी मिळाली आहे.