गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीतून शिवसेनेसाठी सोडण्याची आग्रही भूमिका शिवसेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. सोमवारी संध्याकाळी पक्ष कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही मागणी जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी यांच्याकडे केली. केदारी यांनी तुम्ही पाठपुरावा करा, मी यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या आढावा बैठकीत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली खदखद व्यक्त केली. पूर्वी युतीमुळे भाजपच्या उमेदवारासाठी आणि आता महाविकास आघाडीमुळे काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार करावा लागतो. केवळ मित्रपक्षांचाच प्रचार करायचा तर शिवसेनेचा सिंबॅालचा सामान्य लोकांपर्यंत कसा पोहोचणार, असा सवाल केला. लोकसभा, विधानसभा निवडणुका मैत्रीपूर्ण होतात, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मित्र पक्षाचे स्थानिक नेते मित्रत्व न पाळता त्यांचे स्वहित जागृत होते. त्यामुळे एकमेकांविरोधात लढावे लागते, अशी खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या आढावा बैठकीत गडचिरोलीत शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत नेतृत्व मिळालेच पाहिजे असा सूर व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा प्रमुख (गडचिरोली विधानसभा) वासुदेव शेडमाके, सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, विधानसभा संघटक नंदू कुमरे, माजी जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार, समन्वयक राजेंद्र लांजेकर, विलास ठोंबरे, महीला संघटिका छाया कुंभारे, मंगला भट्टलवार, शितल ठवरे, युवा सेना जिल्हा प्रमुख पवन गेडाम, ता.प्र.किरण शेडमाके, संतोष लोनबले, मनोज पोरटे, ज्ञानेश्वर बगमारे, वैभव गोविंदा बाबनवाडे, अतुल नैताम, शहर प्रमुख वैभव सातपुते, तालुका प्रमुख चेतन उरकुडे, तालुका प्रमुख मारोती बुरे, तालुका प्रमुख भुषण पोरटे, तालुका प्रमुख इम्रान शेख, विधानसभा संघटक गणेश धोटे, प्रशिक झाडे, गुरुदेव सोमनकर, ज्योत्स्ना राजुरकर, कुणाल कोवे, बादल मडावी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.