धनोजे कुणबी समाजाचे स्नेहमिलन, सत्कार आणि आरोग्य तपासणी

मा.खा.नेते यांच्या निधीतून सभागृह

गडचिरोली : धनोजे कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्नेहमिलन व सत्कार सोहळ्याचे आयोजन शासकीय विज्ञान महाविद्यालयाजवळील पोटेगाव बायपास मार्गावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.

प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.मिलिंद नरोटे, धनोजे कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण ताजने, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी शालिग्राम विधाते, प्रा.पारखी, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, प्रा.प्रमोद बोधाने, प्रा.भास्कर नागपुरे यांच्यासह समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पोलीस विभागातील दिवंगत अविनाश गाडगे यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी बोलताना अशोक नेते म्हणाले, माझ्या खासदार स्थानिक विकास निधीअंतर्गत धनोजे कुणबी समाजासाठी एकूण 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये 12 लाख रुपये सभागृहाच्या उभारणीसाठी, तर 3 लाख रुपये संरक्षण भिंतीसाठी आहेत. या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले, याचा मला अतिशय आनंद आहे. या सभागृहाचा समाजाच्या हितासाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी रेखा डोळस यांचा उल्लेख करत रेखाताईंनी वारंवार या सभागृहाच्या उभारणीसाठी निधीची मागणी केली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर होऊ शकला. मी समाजाच्या पाठीशी सदैव उभा राहून विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी मा.खा.नेते यांनी आपल्या 10 वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामांची आठवण करून दिली. आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या विजयानंतर गडचिरोलीच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदाब, शुगर, रक्तगट तपासणी आदी सेवा पुरविण्यात आल्या. तसेच स्नेहमिलनासोबत समाजातील विविध स्तरावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. समाजबांधवांमध्ये ऐक्य निर्माण करून समाजहिताच्या कार्यासाठी सहकार्य वाढवण्याचा निर्धार या सोहळ्यात करण्यात आला. या स्नेहमिलन व सत्कार सोहळ्याने समाजाच्या विकासासाठी एकत्र येण्याची नवी उमेद निर्माण केली आहे. समाजहिताची बांधिलकी कायम ठेवत भविष्यातही अशी उपक्रमशिलता राखण्याचा निर्धार या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.